भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या माहितीनुसार बेळगाव विमानतळाने गेल्या मार्च महिन्यात 30 हजार प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे, जो फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक आहे.
बेळगाव विमानतळावर गेल्या फेब्रुवारी 2022 या महिन्यात 23 हजार 84 प्रवाशांची ये -जा होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये विमानतळावरून 30हजार 467 प्रवाशांचे आगमन आणि प्रस्थान झाले. या पद्धतीने मार्चमध्ये प्रवासी संख्येत 32 टक्क्यांनी (7381) वाढ झाली. अलीकडच्या काळात बेळगाव विमानतळाशी नवे मार्ग जोडले गेल्यापासून आणि येथील विमान फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे विमानतळावर दररोज सरासरी जवळपास 1000 प्रवाशांचे आगमन आणि प्रस्थान होत असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये 451 विमान फेर्या झाल्या आणि त्या तुलनेत मार्चमध्ये वाढ होऊन विमानांच्या 514 फेऱ्या झाल्या. उन्हाळ्याच्या वेळापत्रकात 27 मार्च 2022 पासून स्पाईस जेट कंपनीने दररोज दिल्ली -बेळगाव विमान सेवा सुरू केली आहे, तर स्टार एअरने आठवड्यातून दोन वेळा बेळगाव -नागपुर ही नवी विमानसेवा सुरू केली आहे.
दिल्ली -बेळगाव विमानसेवेसाठी असलेले स्पाईस जेट बी737 हे विमान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 6:05 वाजता निघून बेळगावला सकाळी 8:45 वाजता पोहोचते. त्याचप्रमाणे बेळगाव येथून सकाळी 9:15 वाजता निघून हे विमान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 11:45 वाजता पोहोचते. स्टार एअरलाइन्स कंपनीकडून बेळगाव -नागपुर विमानसेवेसाठी 50 आसनी एब्रर 145 विमानाचा वापर केला जात आहे.
ही विमानसेवा मंगळवार आणि शनिवार अशी आठवड्यातून दोन दिवस उपलब्ध आहे. स्टार एअरचे विमान बेळगाव विमानतळावरून सकाळी 8:30 वाजता प्रस्थान करून सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचते. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता नागपूर येथून निघून या विमानाचे बेळगावला दुपारी 12 वाजता आगमन होते.
स्टार एअर, इंडिगो, स्पाईस जेट आणि अलायन्स एअर या चार विमान कंपन्यांची बेळगाव येथून मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, नाशिक, जोधपुर, इंदोर, तिरुपती आणि सुरत येथे थेट विमान सेवा सुरू आहे. याखेरीज बेळगावहून किशनगड आणि कलबुर्गीला एक थांबा विमानसेवा सुरू आहे.