नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केले.
शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या (व्हीटीयु) डॉ. एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियम हॉलमध्ये भारतीय शिक्षण मंडळाचा कर्नाटक उत्तर विभाग आणि व्हीटीयु यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी आयोजित नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील राष्ट्रीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असलेल्या उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी आपल्या भाषणात कर्नाटकात प्रथमच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सर्व विद्यापीठांमध्ये एनपीए नुसार पहिली परीक्षा झाली आहे. समाज, संस्कृती, नैतिकता, सामाजिक बांधिलकी यांचे हितरक्षण करून सर्वांसाठी उत्तम आयुष्याची निर्मिती करणे आणि उत्तम भविष्य निर्माण करणे तसेच प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार बहाल करणे, हे आमचे ध्येय असल्याचे सांगितले.
यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी आपले समयोचित विचार व्यक्त करताना ब्रिटीश प्रशासनाने राबविलेल्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येत असून नव्या शैक्षणिक धोरणानुसार समाजातील शिक्षण व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण बदल होईल, असे स्पष्ट केले.
भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सच्चिदानंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास रा. स्व. संघाचे समन्वयक डॉ. मनमोहन वैद्य, भारतीय शिक्षण मंडळाचे कर्नाटक उत्तर विभागाचे अध्यक्ष डॉ. सतीश जिगजिन्नी आणि व्हीटीयुचे कुलगुरू प्रा. करिसिद्दप्पा व्यासपीठावर उपस्थित होते.