न्यायालयाचा आदेश डावलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभ्या पिकात यंत्रसामग्री घुसून पुन्हा हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे हाती घेण्यात आल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या कामाला जोरदार विरोध केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे महामार्ग प्राधिकरण विरुद्ध शेतकरी हा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय हाती घेऊ नये, अशा चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशा विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात केलेले अपील फेटाळून लावताना न्यायालयाने बायपासची स्थगिती कायम ठेवली आहे. मात्र हा स्थगिती आदेश डावलून महामार्ग प्राधिकरणाकडून आज मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात बायपास रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. संबंधित भागात शेतकऱ्यांची ऊस, जोंधळा, कडधान्य आदी पिके ऐन जोमात आहेत. या उभ्या पिकात यंत्रे घुसवून बेकायदेशीररित्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मिळताच शेतकरी नेते राजू मरवे यांच्या नेतृत्वाखाली अनिल अनगोळकर, सुरेश मऱ्याकाचे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, नितीन खन्नूकर, अमित अनगोळकर, महेश चतुर आदी संतप्त शेतकरी आणि शेतकरी महिलांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तसेच सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला जोरदार विरोध दर्शविला. त्याचप्रमाणे न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना काम कसे सुरु करता? असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी पोलिस बळाचा वापर करून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना घटनास्थळावरून हटवून एपीएमसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे यांनी न्यायालयाचा आदेश झिडकारून बेकायदेशीररित्या पुन्हा बायपासचे काम हाती घेण्यात आले आहे असे सांगून जाब विचारला असता रस्त्याचे काम सुरू करण्यासंदर्भातील बनावट आदेश आपल्याला दाखविण्यात आल्याचे सांगितले. सदर रस्त्यासाठी पुन्हा उभी पीकं नष्ट करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असे मरवे म्हणाले.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री पाठवून बायपासचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. एका युवा शेतकऱ्याने तर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता. आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत आपला विरोध कायम ठेवत बायपास रस्ता कामाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानंतर चौथ्या दिवाणी न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती देत ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय शिवारातील पिकांना हात लावू नये असे अशी स्पष्ट सूचना केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात स्थगिती विरोधात अपील केले होते. मात्र ते अपील दखील न्यायालयाने फेटाळून लावून बायपासच्या कामाचा स्थगिती आदेश कायम ठेवला. परिणामी हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम यंत्रसामुग्री हटवून पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा हे काम सुरू झाल्यामुळे ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरुद्ध शेतकरी’ हा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.