व्यापार -उद्योगाच्या क्षेत्रात बेळगाव शहराचा आपला असा वेगळा ठसा आहे. बेळगावचा नावलौकिक वाढविण्यात काही ठराविक उद्योजकांचा मोठा वाटा आहे. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपल्या छोट्या उद्योगाचे आज वटवृक्षात रूपांतर केले आहे. अशा या उद्योजकांपैकी एक आहेत जी. जी. लोकूर. ज्यांनी बेळगावात फार पूर्वी खाद्य उत्पादन उद्योगाचा पाया रोवला, जो आज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
जी.जी लोकरी यांनी 50 वर्षापूर्वी ‘मेसर्स आयडियल फुड प्रोडक्ट्स’ या खाद्य उत्पादन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. कर्नाटक विद्यापीठातून 1958 साली पदवीधर झालेल्या लोकूर यांनी 1961 मध्ये मुंबईच्या युडीसीटी मधून खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर 1970 पर्यंत त्यांनी विविध कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळविला. पुणे येथील साठे बिस्किट्स अँड चॉकलेट्स, म्हैसूर येथील सीएफटीआरआय येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ, मुंबईच्या रॉयटर्स चॉकलेट्स तसेच नाडियाड येथील पाॅवर केबलच्या व मुंबईच्या टीम टॉम फूड प्रॉडक्टमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम केले.
या पद्धतीने अन्न उद्योगात मिळालेल्या प्रचंड अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी बेळगाव या आपल्या मूळ गावी मे. आयडियल फुड प्रोडक्ट्स हा स्वतःचा स्वतंत्र प्रकल्प सुरू केला. बेळगावमध्ये सहजपणे तसेच विपुल प्रमाणात उपलब्ध असलेला कच्चामाल, पाणी, मजूर आणि विजेच्या मुबलकतेमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. दळणवळणासह सर्व सोयीस्कर बाबी लक्षात घेऊन जी. जी. लोकूर यांनी मार्च 1972 मध्ये बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या गुडशेड रोड येथील एका लहानशा खोलीत आपले युनिट सुरू केले.
लोकूर यांना विविध प्रकारचे सिरप्स् आणि लोणचे उत्पादनातील तांत्रिक अनुभव असल्याने त्यांनी उत्पादन आणि मार्केटिंगची धुरा सांभाळली तर त्यांच्या पत्नी सौ. सुमन लोकूर यांनी कच्च्या मालाची खरेदी आणि देखरेखीची जबाबदारी स्वीकारली भांडवलाची कमतरता आणि माल पुरविलेल्या ग्राहकांकडून बिले न आल्यामुळे लोकूर यांना प्रारंभी 8 -10 वर्षे खूप त्रासाची गेली. मात्र खचून न जाता प्रचंड आत्मविश्वास आणि धाडसाने आगेकूच करून त्यांनी आपल्या उत्पादन वाढीबरोबरच कार्यक्षेत्र ही विस्तारले. परिणामी मे. आयडियल फुड प्रोडक्ट्सने अल्पावधीत बाजारपेठ काबीज केली.
दरम्यान, जी. जी. लोकूर यांचे मोठे चिरंजीव समीर लोकुर यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आपल्या वडिलांच्या उद्योगात प्रवेश केला आणि दोघांनी मिळून उत्पादनांचे नमुने देखील वाढविले. समीर यांनी दैनंदिन व्यवहारात बरोबरच आपल्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीच्या वाढीसाठी अवरित परिश्रम घेतले. मागणी वाढल्याने जागा कमी पडू लागली, यासाठी उद्यमबाग येथे एफपीओच्या मानकानुसार दुमजली इमारत बांधून त्यांनी आपला उद्योग नव्या जागेत स्थलांतरित केला. सध्या समीर हेच सर्व युनिटची देखरेख करत असून त्यांचे कनिष्ठ बंधू सुबोध लोकूर हे मारूती गल्ली येथील विक्री दुकानातून मार्केटिंग विभाग सांभाळत आहेत.
मे. आयडियल फूड प्रॉडक्ट्सचा खास पदार्थ म्हणजे बदाम थंडाई होय. या थंडाईमध्ये बदाम, केशर, बडीशेप, खसखस, मगजबी, वेलदोडा, गुलाबाच्या पाकळ्या आदी उच्च प्रतीचे मसाले यांचा समावेश असतो. या सर्व जिन्नसांमध्ये शरीरातील उष्णता शोषून घेणारे घटक असतात हे विशेष होय. म्हणूनच ते बॉडी कुलर म्हणून वापरले जाते. याखेरीज पिस्ता सिरप, बदाम केशर सिरप व बदाम सिरप ही देखील आयडियलची कांही लोकप्रिय उत्पादने आहेत. उन्हाळ्यामध्ये त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हे सहा महिने उत्पादन प्रक्रिया गतीने सुरू असते, तर उर्वरित सहा महिन्यात लोणची तयार केली जातात. मुरण्यासाठी ती लाकडी भांड्यात ठेवली जातात. लोणचे पुर्ण मुरल्यानंतर वितरकांच्या मागणीनुसार पॅकिंग करून पाठविले जाते. आंबा, लिंबू, मिरची, मिक्स कैरी वगैरे सर्व तऱ्हेची लोणची आयडियल प्रोडक्ट्सकडे उपलब्ध आहेत.
सध्याच्या युगात पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असल्यामुळे लोणच्यासह बरेचसे पदार्थ घरात तयार करणे शक्य होत नाही. याचा विचार करून लोणच्यासह अनेक तयार पदार्थ आयडियलमध्ये उपलब्ध आहेत. अलीकडे सरकार अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्याबरोबरच त्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मे. आयडियल फूड प्रोडक्ट्सला 1992 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय उत्पादकता परिषद पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. यंदा मे. आयडियल फूड प्रॉडक्ट्स आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यासाठी लोकूर परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.