आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि देशाच्या विविध भागात देश सेवेसाठी रूजू होणाऱ्या बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील एकूण 404 जवानांचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी मोठ्या दिमाखात पार पडला.
एमएलआयआरसीच्या परेड ग्राउंडवर आज सकाळी आयोजित या दीक्षांत समारंभाचे परेड ॲडजुटंट मेजर यू. एस. पिल्लाई हे होते, तर रिक्रुट प्रतीक चंद्रकांत दिघे हा कमांडंट होता. कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून आयोजित या समारंभाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी परेडची पाहणी केली. त्यानंतर तिरंगा ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 404 जवानांनी मातृभूमीच्या संरक्षणाची आणि वेळ पडल्यास त्यासाठी आत्मबलिदान देण्याची शपथ घेतली.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी मराठा लाइट इन्फंट्रीच्या समृद्ध आणि वैभवशाली वारश्याची माहिती देऊन भारतीय लष्करातील ही सर्वात जुनी इन्फंट्री असल्याचे सांगितले.
तसेच सैनिकांच्या जीवनातील शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विषद करून त्यांनी शपथ ग्रहण केलेल्या जवानांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या जवानांना याप्रसंगी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
‘सर्वोत्कृष्ट रेक्रूट’साठी असलेला व्हिक्टोरिया क्रॉस मेडल विजेते नाईक यशवंत घाडगे पुरस्कार रिक्रुट विक्रम संजय लवंडे याला प्रदान करण्यात आला. दीक्षांत समारंभाची सांगता शर्कत युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून करण्यात आली. सदर समारंभास निमंत्रितांसह वरिष्ठ लष्करी अधिकारी, जवान आणि शपथग्रहण करणाऱ्या जवानांचे नातलग बहुसंख्येने उपस्थित होते.
*मराठा सेंटर मध्ये पासिंग आऊट परेड दिमाखात*https://t.co/rvfRJGA6t2 pic.twitter.com/xkfukyRYln
— Belgaumlive (@belgaumlive) April 23, 2022