येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे येत्या 25 ते 28 एप्रिल या कालावधीत होणारा श्री चांगळेश्वरी व श्री कलमेश्वर यात्रोत्सव सुरळीत उत्साहात पार पडावा यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती येळ्ळूर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध खात्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आज बुधवारी विविध खात्यांच्या कार्यालयांना भेटी देऊन उपरोक्त विनंतीचे निवेदन सादर केले.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सीपीआय श्रीनिवास हंडा यांना येळ्ळूर यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाली नव्हती. यावर्षी यात्रा होत असून ती मोठ्या उत्साहात होणार असल्यामुळे भाविकही मोठ्या प्रमाणात येणार आहेत. तेंव्हा सालाबादप्रमाणे चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन यात्रा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.
तसेच वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्रीगुप्पीकर यांना यात्रेत जास्तीजास्त बसेस सोडून भाविकांची सोय करावी असे निवेदन देण्यात आले. हेस्कॉमचे ग्रामीण युनिट असिस्टंट इंजिनिअर प्रशांत टिपगी याना यात्रा काळात अखंडित वीज पुरवठा करावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन सादर करतेवेळी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सदस्य शिवाजी नांदूरकर, प्रमोद पाटील, परशराम परीट, रमेश मेणसे, राजू डोंन्यांनावर आदी उपस्थित होते.