बेळगाव उत्तरच्या आमदारांनी आता सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांविरोधात ‘बुलडोझर’ मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने कपलेश्वर उड्डाण पुला मागोमाग आता जुन्या पी. बी. रोड येथील उड्डाणपुला शेजारील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी नागरिक आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी आता शहरातील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करण्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. बुलडोझर -जेसीबी लावून सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवून संबंधित रस्ते नागरिकांना रहदारीसाठी सुलभ करण्याचा निर्णय आमदारांनी घेतला आहे.
यामुळे सर्व्हिस रोडवर बेकायदा अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. आमदार ॲड. बेनके यांनी आज सकाळी जातीने पाहणी करून कपिलेश्वर उड्डाणपूल येथील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविली. यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक समाधान व्यक्त करताना दिसत होते.
कपिलेश्वर उड्डाणपुलाला मागोमाग आता जुन्या पी. बी. रोड येथील भरतेश शिक्षण संस्थेनजीक असलेल्या उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रोड अतिक्रमणे हटवून खुले केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने या रस्त्यांवर मार्किंग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी स्वतःहून सर्व्हिस रोडवरील आपली अतिक्रमणे हटवावी त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. महापालिकेच्या आवाहनानुसार काहीजणांनी आपापली अतिक्रमणे हटविली आहेत. आता लवकरच या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून संबंधित सर्व्हिस रोड रहदारी साठी खुले केले जाणार असल्याची माहिती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना दिली.
त्याचप्रमाणे आता यापुढे शहरात रस्त्यावर बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रारंभी पूर्वसूचना दिली जाईल आणि त्यानंतर थेट बुलडोझर लावून अतिक्रमणे हटवली जातील असेही आमदारांनी स्पष्ट केले. आमदारांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील अतिक्रमणाने व्यापलेले सर्व्हिस रोड आता मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.