राजस्थानी युवक सेवा मंडळ शहापूर बेळगाव यांच्यातर्फे आयोजित 9 व्या राजस्थानी प्रीमियर लीग (आरपीएल) वार्षिक शॉर्ट पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बालाजी प्राईड या संघाने हस्तगत केले, तर तुफान टीम या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शहापूर येथील राजस्थानी युवक सेवा संघातर्फे गेल्या 9 वर्षापासून दरवर्षी राजस्थानी प्रीमियर लीग (आरपीएल) शॉर्ट पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा गेल्या 17 ते 28 एप्रिल या कालावधीत उप्पार गल्ली खासबाग येथील शाळा क्र. 3 च्या मैदानावर सदर वार्षिक क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात आली.
यंदा या स्पर्धेत 12 संघाने सहभाग दर्शविला होता. काल रात्री प्रकाशझोतात खेळविला गेलेला स्पर्धेचा अंतिम सामना तुफान टीम आणि बालाजी प्राईड या संघांमध्ये झाला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून बालाजी प्राईड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना तुफान संघाने मर्यादित 10 षटकात विजयासाठी 33 धावा काढण्याचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांना समोर ठेवले. हे आव्हान यशस्वीरित्या झेलताना बालाजी प्राईड संघाने अवघ्या 7 षटकात 33 धावा काढून विजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कारासाठी भारत तापडिया याची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे ‘मॅन ऑफ द सिरीज’ अर्थात मालिकावीर किताब मनीष मुंदडा याला प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून भारत तापडिया आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निलेश बंग यांची निवड करण्यात आली. काल गुरुवारी रात्री अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक पारितोषिके देण्यात आली. त्याच प्रमाणे वैयक्तिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
बालाजी वेफर्सचे राधेजी तोषनीवाल हे या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते होते. त्यांच्यासह अन्य पुरस्कर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजस्थानी युवक सेवा मंडळाचे अध्यक्ष जय राठी आणि सेक्रेटरी सचिन बजाज यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य शरद हेडा, पवन तापडिया, निलेश बंग, आनंद झंवर, विजय जाजू तसेच अन्य पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.