Wednesday, November 20, 2024

/

दुखापतीवर मात करत ‘याने’ गाठले यशाचे शिखर

 belgaum

भारताचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रॉबिन सिंग सारखे जगात असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःला झालेल्या गंभीर आजारावर मात करून नावलौकिक मिळविला. बेळगावातही असा एक मातब्बर क्रीडापटू अर्थात शरीरसौष्ठवपटू आहे ज्याचे नांव आहे विशाल चव्हाण. ज्याने आपल्या पाठीच्या दुखापतीवर मात करत अनेक मानाचे किताब हस्तगत केले आहेत.

बेंगलोर येथील श्रीरामपूर आंबेडकर मैदानात नुकत्याच झालेल्या बाबुज क्लासिक राज्यस्तरीय स्पर्धेत शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा विशाल चव्हाण याने आपल्या पिळदार शरीरसौष्ठवाचे प्रात्यक्षिक दाखवत ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक आणि ओव्हर ऑल चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद पटकाविले.

बेळगाव जिल्ह्यातील अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये मानाचे किताब मिळविणारा विशाल चव्हाण हा गेल्या दोन वर्षापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तथापि या दुखापतीवर मात करत त्याने ‘बेळगाव श्री’, ‘हिंडलगा श्री’ आणि ‘रॉ फिटनेस क्लासिक श्री’ हे प्रतिष्ठेचे किताब मिळविले आहेत.

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना भरभक्कम पिळदार शरीराचा विशाल चव्हाण म्हणाला की, मागील दोन वर्षापासून मी माझ्या पाठीच्या आजाराने त्रस्त झालो होतो. व्यायाम करताना माझ्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. मी तत्पूर्वी स्पर्धेमध्ये भाग कांहीमध्ये चांगले यश मिळाले तर कांहीमध्ये निराशा पदरी पडली.

परंतु शरीरसौष्ठव क्षेत्रातील मानाचे टायटल अर्थात किताब हस्तगत करणे हे एकच लक्ष्य मी माझ्या नजरेसमोर ठेवले होते. तथापि वारंवार प्रयत्न करून देखील पाठीच्या दुखापतीमुळे टायटल मिळविण्याचे माझे स्वप्न भंग होत होते. पाठीच्या असह्य वेदना, डॉक्टरांचे सल्ले वगैरे अनेक गोष्टींनी मी त्रस्त झालो होतो. तो काळ माझ्यासाठी फार कठीण होता, असे विशाल म्हणाला.Body Builder

शरीरसौष्ठव क्षेत्र सोडले तर माझे टायटल संपादन करण्याची स्वप्न अपुरे राहणार या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो. अखेर जिद्द न सोडता ठाम निर्णय घेतला आणि मोठ्या आत्मविश्वासाने मी पूर्ण क्षमतेने तयारीला लागलो. नव्या जोमाने शरीरसौष्ठवाच्या मैदानात उतरलो.

प्रारंभी त्रास झाला. मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक समस्येवर मात करत मी अनेक स्पर्धांमध्ये विजेता ठरलो. यासाठी स्वअनुभवावरून माझे उदयोन्मुख क्रीडापटूंना एकच सांगणे आहे अपयशाने निराश होऊ नका. उराशी ध्येय, जिद्द आणि आत्मविश्वास बाळगा यश आपोआप तुमच्या पायापर्यंत चालत येईल, असे ‘बेळगाव श्री’ विशाल चव्हाण याने सांगितले.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.