बेळगाव शहरातील वडगाव येथे 4.10 एकर जमिनीमध्ये 130 कोटी रुपये खर्चाच्या कीदवाई कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती बेंगलोर कीदवाई कॅन्सर संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी दिली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुमकुर, शिमोगा आणि म्हैसूर येथे कीदवाई केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. त्या पद्धतीनेच बेळगाव दक्षिण मतदार संघाच्या आमदारांनी केलेल्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी बेळगाव येथे कीदवाई कॅन्सर संस्थेची शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पुढील महिन्यात स्वतः मुख्यमंत्री बेळगावातील किदवाई कॅन्सर हॉस्पिटल इमारतीचे भूमिपूजन करतील. त्यानंतर पुढील दोन वर्षात या कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली जाईल, असे डॉ. रामचंद्र यांनी सांगितले.
बेळगावात उभारण्यात येणारे कीदवाई कॅन्सर हॉस्पिटल सुरुवातीला 100 बेड्सचे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या हॉस्पिटलचा विस्तार केला जाईल. सदर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी संबंधित रेडिओथेरपी, केमोथेरपी शस्त्रक्रिया आदी सर्व उपचार व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये संशोधन केंद्र देखील असेल. या सर्वांसाठी विविध विभाग केले जातील. भविष्यात हॉस्पिटलचा विस्तार करता यावा यासाठी अनुकूल जमीनही निश्चित करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बेळगावमध्ये किदवाई कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. यासाठी सुसज्ज मोबाईल पथकाद्वारे कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केली जाणार आहेत असेही डॉ सी रामचंद्र यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदी उपस्थित होते.
Tumachya karyala Dev tumachya pathishi raho