येळ्ळूर येथील गायरान जमिनीमध्ये मिनी स्टेडियम उभारण्याची योजना युवा सबलीकरण व क्रीडा खात्याने आखली आहे. मात्र सदर स्टेडियमला तीव्र विरोध दर्शविण्यात आला असून येळ्ळूर गायरान जमिनी ऐवजी अन्यत्र हे मिनी स्टेडियम उभारण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
येळ्ळूर ग्रामस्थांतर्फे येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांच्या गुरांसाठी राखिव असलेली सरकारी गायरान 66 एकर 17 गुंठे जमिनीपैकी 40 एकर जमीन युवा सबलीकरण व क्रीडा खात्याच्या मिनी स्टेडियम निर्मितीसाठी सरकारने मंजूर केली आहे. ही जमीन स्टेडियमसाठी घेतल्यास गावातील गुराढोरांचे हाल होणार आहेत.
गावामध्ये 2,700 जनावरे आणि 350 इतर पाळीव प्राणी आहेत. गावची लोकसंख्या 18000 आहे. गावातील 80 टक्के लोक शेतकरी असून त्यांना गायरान जमिनीची आवश्यकता आहे. सदर जमीन मिनी स्टेडियमसाठी दिल्यास जनावरांचे चाऱ्या विना हाल होऊन शेतकरी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार आहे.
ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा मिनी स्टेडियमला विरोध नाही. मात्र गायरान जमिनी ऐवजी दुसरी जमीन घेऊन त्या ठिकाणी ते स्टेडियम उभारण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी. थोडक्यात गावातील गुरांचा विचार करून अन्यत्र दुसऱ्या जमिनीवर मिनी स्टेडियमची निर्मिती केली जावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील म्हणाले की, अलीकडेच ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र आले. त्या पत्राद्वारे येळ्ळूर गावच्या सरकारी गायरान सर्वे नं. 1142 क्षेत्र 66 एकर 17 गुंठे पैकी 40 एकर जागेवर मिनी स्टेडियम उभारण्यात येणार आहे आणि लवकरच त्यासंदर्भात भूसंपादन केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. येळ्ळूर गावातील 80 टक्के लोक हे शेतकरी आहेत त्यामुळे मिनी स्टेडियमसाठी गायरान जमीन घेतल्यास शेतकऱ्यांच्या जनावरांचे हाल होणार आहेत. येळ्ळूर गावची लोकसंख्या 18 ते 20 हजार इतकी आहे. त्यामुळे या गावाला गायरान जमिनीची नितांत गरज आहे असे सांगून मिनी स्टेडियमला आमचा विरोध नाही. मात्र ते गायरान जमिनीत न उभारता अन्यत्र दुसऱ्या जागी उभारण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे. येळ्ळूर परिसरातच मिनी स्टेडियम उभारावयाचे असल्यास प्रथम गावकऱ्यांना विश्वासात घेतले जावे, अशी विनंती आम्ही जिल्हाधिकार्यांना केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षांसह उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, ग्रा.पं. सदस्य परशुराम परीट, राजकंवर पावले, प्रमोद पाटील, राजू डोण्यानावर, रमेश मेणसे, शशी धुळेजी, अरविंद पाटील, पिंटू चौगुले, विलास बेडरे, यल्लाप्पा मेलगे, सोनाली येळ्ळूरकर, रूपा पुण्यानावर, शांता काकतकर आदी उपस्थित होते.