शिक्षण खात्यातर्फे लवकरच केल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये ‘महिलाराज’ दिसून येणार आहे.
शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून सीईटी परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केले जात आहेत. राज्यात 10 हजार तर कल्याण कर्नाटकसाठी 5 हजार जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
यावेळच्या शिक्षक भरतीमध्ये देखील नेहमीप्रमाणे महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीनंतर पुन्हा एकदा महिला शिक्षकांची संख्या वाढणार असून सध्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यात महिला शिक्षकांची संख्या पुरुष शिक्षकांच्या दुप्पट आहे.
शिक्षक भरतीचा कोटा पुढील प्रमाणे असणार आहे. महिलांसाठी 50 टक्के, ग्रामीण भागासाठी 25 टक्के, दिव्यांगांसाठी 5 टक्के, कन्नड माध्यमांसाठी 5 टक्के, योजनांमुळे निराश्रित झालेल्या कुटुंबातील उमेदवारांसाठी 5 टक्के तृतीयपंथियांसाठी 1 टक्का आणि माजी सैनिकांसाठी 9 टक्के.
दरम्यान, पदवीधर शिक्षकांची भरती केली जाणार असल्याने टीईटी परीक्षार्थींनी सीईटीची तयारी आतापासून सुरू केली आहे. सरकारने अधिसूचना जाहीर केल्याप्रमाणे अर्ज दाखल करताना परीक्षार्थींना आपले माध्यम, ग्रामीण भाग, माजी सैनिक, दिव्यांग, कन्नड माध्यम तसेच विविध योजनांमुळे निराश्रित झालेल्या कुटुंबातील सदस्य असल्यास तशा प्रकारची नोंदणी करावी लागणार आहे. सीईटी परीक्षा 21 व 22 मे रोजी पार पडणार आहे.