बेळगांव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील आयडीबीआय बँकेपासून ते हिंडलगा गणपती मंदिर परिसरातील पथदीप गेल्या बऱ्याच दिवसापासून बंद असून यामुळे चोराचिलटांचे भय वाढल्यामुळे हे पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव शहर स्मार्ट सिटी बनत असले तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सिटीचे उपनगरांना जोडणारे बहुतांशी रस्ते अंधारात आहेत. शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील आयडीबीआय बँकेपासून ते हिंडलगा गणपती मंदिरा पर्यंतचा रस्ता हा त्यापैकीच एक रस्ता आहे. सदर रस्त्यावरील पथदीप गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्यावरील या अंधाराचा भुरटे चोर गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या रस्त्यावर भुरटे चोर आणि मवाल्यांचा वावर वाढण्याबरोबरच अन्य गैरप्रकारांना देखील ऊत आला आहे. याखेरीज रस्त्यावरील अंधारामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.
सदर रस्त्यावरील पथदीप दुरुस्त करून पूर्ववत प्रज्वलित केले जावेत यासाठी वारंवार तक्रार आणि मागणी करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. तेंव्हा लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन या मार्गावरील पथदीप तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.