Friday, January 3, 2025

/

युक्रेनमध्ये अद्याप आहेत बेळगावचे 17 जण

 belgaum

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले बेळगाव जिल्ह्यातील 17 विद्यार्थी युद्धाचा भडका उडालेल्या युक्रेनमध्ये अद्यापही अडकून पडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.

शहरात आज सकाळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 19 विद्यार्थ्यांपैकी दोघेजण सुरक्षित माघारी परतले आहेत. राज्याचे नोडल अधिकारी डॉ. मनोज राजन यांनी आम्हाला जी यादी पाठवली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यापैकी दोघेजण नुकतेच भारतात परतले आहेत असे सांगून जे 17 विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्ये आहेत त्यांच्या नांवाची यादी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना -नातलगांना भेटून धीर द्यावा. त्यांचे मनोधैर्य वाढवावे अशी सूचना तहसीलदारांना देण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत तहसीलदारांनी 12 विद्यार्थ्यांच्या घरच्यांची भेट घेतली आहे. मी स्वतः देखील कांही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतली आहे, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.Ukrain

युक्रेनच्या पूर्व भागामध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप स्वदेशी आणण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे एक पथक रवाना झाले आहे. आपण सर्वांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना धीर देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे कार्य केले पाहिजे. राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळोवेळी आवश्यक माहिती पुरवली जात आहे.

युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बेळगाव जिल्ह्यातील दोन अधिकारी तीन दिवसांपूर्वीच मुंबईला गेले आहेत. बेळगाव स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी आणि बेळगावचे एसी रवी कर्लिंगनावर हे उभयता मुंबई विमानतळावर तळ ठोकून आहेत. हे दोन्ही अधिकारी युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांना त्यांच्या गावी पाठवून देण्याची व्यवस्था करत आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.