गेल्या कांही दिवसात शहरातील बाजारपेठेत 10 रुपयांच्या चलनी नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ जनजागृती करून नागरिकांना 10 रुपयांची नाणी चलनात आणण्याचे आवाहन करावे, न हून नोटा उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी व्यापारी व दुकानदारांकडून केली जात आहे.
शहरात दिल्या दोन महिन्यापासून दहा रुपयांच्या चलनी नोटा कमी झाल्या आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व बँकेने 10 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी 10 रुपयांची नाणी चलनात आणण्यात आली आहेत. देशातील अन्य राज्यात विशेष करून महाराष्ट्रात याची अंमलबजावणी होत आहे. बेळगावात मात्र म्हणावी तशी जनजागृती नसल्यामुळे 10 रुपयाचे नाणे अद्यापही चलनात आलेले नाही. आता नोटाही चलनातून नाहीशा होऊ लागल्या आहेत.
या पद्धतीने गेल्या आठवड्याभरापासून बेळगाव शहरात 10 रुपयांच्या नोटा आणि नाणी दोन्हीही चलनात नाहीत की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी दुकानदार, हॉटेल व्यवसायीक, कोल्ड्रिंक हाऊस चालक वगैरे मंडळी त्रासात पडली असून त्यांचा मनस्ताप वाढला आहे. चिल्लर नसेल तर चॉकलेट वगैरे देऊन वेळ मारुन नेता येते परंतु दहा रुपयांऐवजी काय द्यायचे? अशा अडचणीच्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे चिल्लर देऊन बँकेतून 10 रुपयांच्या नोटा आणायचे म्हंटल्यास संबंधित नोटा जुन्या व अत्यंत दुरावस्थेतील असल्याची तक्रार आहे. नोटा चलनातून कमी झाल्या आणि नाणी कोणी स्वीकारत नाही यामुळे दुकानदार आणि ग्राहक या दोघांनाही सध्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात बोलताना बेळगाव लाइव्हशी बोलताना कावेरी कोल्ड्रिंक हाऊसचे संचालक शिवाजीराव हंडे यांनी गेल्या आठवडाभरापासून 10 रुपयांच्या नोटांची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन एक तर नागरिकांनी 10 रुपयांचे नाणे चलनात आणावे यासाठी युद्धपातळीवर जनजागृती मोहीम राबवावी अथवा 10 रुपयांच्या चलनी नोटांचा पुरवठा करावा, अशी मागणीही केली. रविवार पेठेतील व्यापारी अजित सिद्दण्णावर यांनी 10 रुपयांच्या नोटांची टंचाई निर्माण होणे हा 10 रुपयांची नाणी चलनात आणण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्याचे सांगितले. तथापि बेळगावात यासंदर्भात जनजागृती होत नसल्यामुळे बाजारपेठेत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय रिझर्व बँकेने चलनात आणलेली सर्व नव्या नाण्यांचा दैनंदिन व्यवहारामध्ये सर्रास वापर केला जात आहे. बेळगावातही लवकरात लवकर तसे घडणे अपेक्षित असून यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत सिद्दण्णावर व्यक्त केले.