जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी पर्यंतच्या शांताई वृद्धाश्रमाला जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप बसवण्याबरोबरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून आश्रमातील वृद्धांची चांगली सोय होऊ शकेल, अशी मागणी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. यावेळी विजय मोरे यांनी बामणवाडी गावाकडे जाणारा रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे आणि या रस्त्यावर पथदीप बसवणे किती गरजेचे आहे हे जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले.
जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील प्रतिष्ठित पाटील कुटुंबीयांच्या त्याग व योगदानातून 1998 साली शांताई वृद्धाश्रमाची (दुसरे बालपण) स्थापना झाली. सध्या या वृद्धाश्रमांमध्ये 38 वयस्क महिला आणि 8 पुरुष असे एकूण 42 ज्येष्ठ नागरिक आश्रयाला आहेत. या सर्वांच्या दिवसाची सुरुवात स्वतःच्या आणि परिसराच्या शुद्धतेसाठी केल्या जाणाऱ्या अग्निहोत्र विधीने होते. दैनंदिन प्रार्थनेसह शांताई वृद्धाश्रमात फिजिओथेरपी आणि योगावर्ग घेतले जातात.
याखेरीज आश्रमातील वृद्ध सदस्यांचे दिवसभर मन रमावे यासाठी आवड आणि शारीरिक क्षमतेनुसार त्यांच्यावर बगीच्यातील माळी काम, स्वयंपाक, साफसफाई आदी कामे सोपविली जातात. त्याचप्रमाणे या वृद्ध मंडळींच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी टीव्ही, लघु ग्रंथालय, स्नेहमेळावा, सहली आदी मनोरंजनाचे विविध मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शांताई वृद्धाश्रमात कोणताही भेदभाव न करता ज्याना कोणाचाही आधार नाही अथवा निवृत्तीवेतन नाही, अशा सर्व जाती-धर्माच्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आश्रय दिला जातो. आश्रमातील प्रवेशासाठी वयाची अट महिलांसाठी 55 वर्षे किंवा त्यावरील आणि पुरुषांसाठी साठ वर्षे किंवा त्यावरील अशी आहे. मात्र जोडप्याला आश्रमात प्रवेश नाही. सदर आश्रमातील वृद्धांची त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व प्रकारे काळजी घेतली जाते.
सदर आश्रम चालविण्यासाठी दरमहा सुमारे 2 लाख रुपये खर्च येत असून आश्रमाला कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. ही संस्था संपूर्णपणे समाजातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीवर कार्यरत आहे. विविध वैद्यकीय संस्था विशेष करून केएलई संस्थेचे डॉक्टर्स वेळोवेळी शांताई वृद्धाश्रमांमध्ये आपली सेवा उपलब्ध करून देत असतात. आश्रमातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध आणि दिनचर्ये बाबत मार्गदर्शन केले जाते. आश्रमात बाहेरील अन्न अथवा मिठाई आणण्यास मनाई असून स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते. आश्रमातील सदस्यांसाठी सुसज्ज स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक बनविला जातो. या पद्धतीने एकंदर शांताई वृद्धाश्रम हे तेथे आश्रय घेतलेल्या वृद्धांसाठी जणू दुसरे घरकुलचा आहे. तरी याची दखल घेऊन आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी गावापर्यंत पुढच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करून पथदीप लावावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांच्यासह संचालक संतोष ममदापुर, संजय वालावलकर, ॲलन मोरे, बाळूमामा, बामणवाडी ग्रा. पं. सदस्य संजय हणबर, मारुती पायान्नाचे, आर. एन. नलवडे, अरुण पोटे, आर. एम. चौगुले आदी उपस्थित होते.