बेळगाव शहरातील एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा किसान कनेक्ट हा संघ ईव्ही ट्रॅक्टरसाठी बहुआयामी रेट्रोफिट उपकरण बनवल्याबद्दल सुवर्णपदकासह 5 लाख रुपये बक्षीसचा मानकरी ठरला आहे. या संघाला केपीआयटी स्पार्कल 2022 इनोव्हेशन चॅलेंजचा विजेता घोषित करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी विज्ञान आणि डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जगामध्ये ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि मोबिलिटी सोल्युशनसमध्ये अग्रेसर असणाऱ्या केपीआयटी
कंपनीतर्फे ‘केपीआयटी स्पार्कल 2022’ या राष्ट्रीय डिझाईन आणि विकास नवकल्पना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी ही स्पर्धा होत असते.
होतकरू युवा नवनिर्मितीकारांना ऊर्जा आणि गतिशील क्षेत्राच्या वास्तविक जगातील आव्हानांवर मात करण्यासाठी स्वदेशी उपाय विकसित करण्यास प्रोत्साहित करणारे व्यासपीठ म्हणून या स्पर्धेला सर्वाधिक मागणी आहे.
केपीआयटी स्पार्कल 2022 साठी देशभरातील 800 महाविद्यालयांमधील सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांकडून 1300 हून अधिक कल्पना प्राप्त झाल्या होत्या.
यामधून अंतिम सर्वोत्तम 24 चमुंमध्ये काल शनिवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये महाअंतिम फेरी झाली. गेल्या जवळपास 8 वर्षात केपीआयटी स्पार्कलला देशातील 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांकडून जवळपास 16 हजार कल्पना प्राप्त झाल्या आहेत.