काही दिवसापूर्वी *बेळगाव LIVE* ची बातमी वाचताना एक ओळखीचा चेहरा पटकन लक्षात आला. प्रिया आदर्श मुचंडी माझी बालपणीची मैत्रीण तिला उत्तर कर्नाटकात सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. लगेच मला आमच्या मराठी शाळेतील प्रिया आठवली. शाळेच्या प्रार्थना सभेमध्ये *पक्षी उडतो निळ्या आकाशात दोन नंबर शाळेचे नाव भारताच्या नकाशात* हा सुविचार वाचणाऱ्या प्रियाने खरोखरच शाळेचेच नाही तर संपूर्ण बेळगाव शहराचे नाव राज्यात रोशन करून दाखविले.
मराठी शाळेमध्ये शिकलेली, सातच्या आत घरात अश्या नियमबद्ध मध्यमवर्गी कुटूंबात वाढलेली, हातामध्ये जवळपास तिच्या इतकाच उंचीचा लाकडी बोर्ड घेऊन, खाली मान घालून अभियांत्रिकी कॉलेजला जाणारी प्रिया ते आजची कर्नाटकातली एक नामवंत अर्चिटेक्ट प्रिया. माझ्या मैत्रिणीच्या या प्रवासातून खूप काही शिकण्या सारखं आहे.
ऋषभ पंतने एखाद्या वेगवान गोलंदाजाला एक हाताने षटकार खेचावा तितक्याच सुलभतेने तिने हा पल्ला गाठला असावा असे तिला दुरून ओळखणार्यांना नक्कीच वाटत असेल. कारण यशाच्या मागे डोळे बंद करून धावणारा हावरेपणा कधीच तिच्या स्वभावात दिसत नाही. पण यशाच्या या शिखरावर पोहचण्या साठी तिने केलेले कष्ट, तिच्या मार्गामध्ये आलेल्या अडचणी याची मला पूर्ण जाणीव आहे. हे सगळं साधं, सरळ आणि सोपं कधीच नव्हतं.
मुलगी असून सिव्हिल अभियांत्रिकी कॉलेजला जाते म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी केलेली टिंगल टवाळी , घराची जेमतेम आर्थिक परिस्थिती, मार्गदर्शनाचा अभाव , मराठी मेडीयम चा स्टॅम्प…. ती पडली, ती रडली, ती थकली, लोकांनी पाय देखील ओढले पण पुष्पा म्हणतो तसा *मैं झुकेगा नहीं साला,* याच आत्मविश्वासाने ती पुढे पाय टाकीत गेली. एका अर्चिटेक्ट च्या हाताखाली रु ५०० महिना पगाराच्या नोकरीपासून ते नुकताच सुरवात केलेला तिचा स्वतःचा रु ५ कोटी चा हिल टॉप अपार्टमेंट (लक्ष्मी टेक) चा प्रोजेक्ट हे तिने खूप तरुण वयात करून दाखविले. तिने दाखवून दिले ज्या व्यक्ती कडे संयम, साहस व प्रामाणिकपणा असतो त्या व्यक्तीला कोणतीच गोष्ट असाध्य नसते. आज ती समाजातील कितीतरी तरुणींसाठी एक आदर्श, एक प्रेरणास्थान, एक मार्गदर्शक म्हणून उभी आहे.
आपलं ऑफिस आणि घर ती बरोबरीच्या उमेदीने सांभाळते. आपल्या कामाच्या गडबडीत आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये याची ती विशेष काळजी घेते. जितका सुंदर ती आपला प्रोजेक्ट डिजाइन करते तितकाच सुबक स्वयंपाक देखील बनवते. तिने आपल्या लाघवी स्वभावाने मोजकाच पण जिवाभावाचा मित्र परिवार देखील जोडला आहे. आपल्या यशाचं श्रेय ती आपल्या आई वडिलांना व प्रत्येक प्रसंगात साथ देणाऱ्या आपल्या पती व सासू सासऱ्यांना देते. इतकं सगळं सहजपणे सांभाळणारी प्रिया मला सुपरवूमेनच वाटते.
तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी मी खास तिचा आवडीचा मैसूर पाक घेऊन तिच्या ऑफिस कम घरामध्ये पोहचले. आपल्या काचेच्या केबिन मध्ये बसून क्लायंट बरोबर बोलणाऱ्या प्रिया कडे पाहून नकळत माझ्या डोळ्यात पाणी आल, मन अभिमानाने भरून आल. मी नको म्हणत असताना देखील तिने चहा चा बेत आखला. चहा बनवत असताना ती हळू आवाजात काही तरी गुणगुणत होती…हो तेच ते आमच्या प्राथमिक शाळेची प्रार्थना. मी देखील तिच्या सुरात सूर लावला…. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे…खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे…
-वर्ग मैत्रीण – *प्राथमिक शाळा क्रमांक 2 , गणपत गल्ली, बेळगाव*