नियोजित बेळगाव – धारवाड रेल्वेमार्गाचा आराखडा बदलून के के कोप्प मार्गे वळविण्यात यावा, असा आग्रह करत आज बेळगाव मध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. यानंतर खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयावर मोर्चा नेत नियोजित रेल्वे मार्गाला आपला विरोध असल्याचे सांगितले. तसेच हा नियोजित रेल्वेमार्ग बदलण्यात यावा, असा आग्रहदेखील केला.
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्ग आराखडा ज्या ठिकाणी नियोजित करण्यात आला आहे, त्याअंतर्गत गर्लगुंजी, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहळ्ळी, नागिरहाळ, के. के. कोप्प, हलगीमर्डी येथील सुपीक जमीन रेल्वे मार्गात जाणार आहे. या भागात अल्पभूधारक शेतकरी आहेत. नियोजित रेल्वेमार्गामुळे या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत येणार असून सदर रेल्वेमार्ग इतर ठिकाणी बदलण्यात यावा असा आग्रह शेतकऱ्यांनी यावेळी केला.
नियोजित रेल्वे मार्ग अंतर्गत सुपीक आणि सिंचन जमीन उध्वस्त होणार असून यामुळे शेतकरी देखील अडचणीत येणार आहेत. यामुळे रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून सदर रेल्वेमार्ग ओसाड जमिनीवर बदल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा देखील करण्यात आली असून सदर मार्ग के के कोप्प, देसूर या मार्गे हा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी विनंती करण्यात आल्याचे आंदोलकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
यावेळी आंदोलकांनी खासदार मंगला अंगडी यांच्यावर संताप व्यक्त करत दिवंगत सुरेश अंगडी यांच्या नियोजनाबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या समस्या अंगडी कुटुंबियांना माहित नसून त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
एकाबाजूला खासदारांची आश्वासने आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय कामकाज, नोटिफिकेशन आणि सूचना. यामुळे शेतकरी उध्वस्त होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
उपस्थित शेतकरी आंदोलकांना खासदार मंगला अंगडी यांनी आपण रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून आपली मागणी मांडण्याचे आश्वासन दिले. आपल्याला शेतकऱ्यांची काळजी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन देखील खासदारांनी केले.