महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथील पाईपलाईन रोड या रस्त्याच्या विकास कामात निर्माण केला जाणारा अडथळा दूर करून हा रस्ता 60 फुटाचा करावा, या मागणीसाठी या भागातील विविध वसाहतींमधील जवळपास 150 ते 200 स्त्री-पुरुष नागरिकांनी आज शनिवारी सदर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले.
आपल्या आंदोलनासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना महालक्ष्मीनगर येथील रहिवासी विश्राम गावडे म्हणाले की, बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने गेले कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या पाईपलाईन रोड या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
सदर पाईपलाईन रोडच्या पलीकडे सरस्वतीनगर, महालक्ष्मीनगर, सैनिकनगर, आर्मी कॉटर्स, शिवनेरी कॉलनी, केएचबी कॉलनी आदी वसाहती आहेत. या वसाहती गेल्या 15 -20 वर्षाच्या काळात निर्माण झाल्या असून या ठिकाणी जवळपास 20 हजार नागरिक राहतात. या सर्व वसाहतींकडे जाण्यासाठी पाईपलाईन रोड हा एकमेव अप्रोचचा रस्ता आहे. या दुर्लक्षित रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले होते. त्याचप्रमाणे खराब रस्त्यामुळे नागरिकांची कुचंबना होण्याबरोबरच हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरू लागल्यामुळे सदर रस्त्याचा विकास केला जावा, अशी या भागातील नागरिकांची बऱ्याच काळापासूनची मागणी होती, असे गावडे यांनी सांगितले.
सदर मागणीची दखल घेणाऱ्या आमदार हेब्बाळकर यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम गेल्या 15 दिवसांपासून सुरू झाले आहे. मात्र कांही विघ्नसंतोषी लोकांनी या रस्त्यावर खांब वगैरे रोवून विकास कामात अडथळा आणणे, कंत्राटदाराच्या लोकांना शिवीगाळ करणे वगैरे प्रकार सुरू केले होती. कांही मूठभर विघ्नसंतोषी मंडळी रस्त्याच्या कामात अडथळा आणत असल्यामुळे पाईपलाईन रोड रस्त्याचा चांगला विकास केला जावा, हा रस्ता 60 फुटी करावा, या मागणीसाठी आम्ही या भागातील वसाहतींमधील नागरिकांनी आज सदर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले आहे, असे विश्राम गावडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आंदोलनकर्त्या नागरिकांनी आपल्या मागणीचे निवेदन आमदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे. आजच्या या ठिय्या आंदोलनात अरविंद कापडिया, लुईस रॉड्रिग्स, विल्सन कर्वालो, अर्जुन बिलावर, विश्राम गावडे, के. एस. तुळजी, रामरतन गवस, सदानंद गावडे आदींसह सुमारे 150 ते 200 स्त्री-पुरुष नागरिक सहभागी झाले आहेत.