बेळगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन युद्धग्रस्त भागात अडकले होते. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून प्रयत्न करत असून आतापर्यंत अनेक विद्यार्थी भारतात सुखरूप परतले आहेत.
बेळगावमधील एकूण २० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १७ विद्यार्थी सुखरूप परतले असून उर्वरित ३ विद्यार्थी देखील लवकरच आपल्या मायदेशी परतणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली आहे.
युक्रेनमधून आज बेळगावमधील ९ विद्यार्थी सुखरूप परतले असून बेळगाव सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे. या विद्यार्थ्यांचे पालकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सांबरा विमानतळ येथे ७, हुबळी मध्ये २, अशा एकूण ९ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात आले आहे. श्रेया हेरकल, मूडलगी तालुक्यातील हळळूर या गावातील प्रिया आणि प्रीती छब्बी, गोकाक तालुक्यातील अमोघ चौगुले, रायबाग तालुक्यातील प्रिया निडगुंदी आणि बागलकोटमधील दोन विद्यार्थ्यांचा या ९ विद्यार्थ्यांमध्ये समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले
युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचे आव्हान भारत सरकारसमोर उभे असून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात येत आहे. ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे.
बेळगावमधील एकूण २० विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी आतापर्यंत बेळगावमध्ये परतले असून उर्वरित ३ विद्यार्थी पोलंडमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांनाही लवकरात लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.