बेळगुंदी येथील रियल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा लागत असताना रेणुकानगर परिसरात गवत गंजीमध्ये घालून एका अज्ञात युवकाचा जाळून भीषण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
बेळगाव शहर व परिसरात गुढ खुनांच्या मालिका सुरूच असून काल बुधवारी सकाळी रेणुकानगर परिसरात आणखी एक खळबळजनक खुनाचा उलगडा झाला आहे. या ठिकाणी गवत गंजी घालून एका अज्ञाताला जाळण्यात आले आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सुमारे 25 ते 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविला आहे. यासंबंधी वंटमुरी कॉलनी येथील यल्लाप्पा फकीरा बुडग यांनी मारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी रात्री 9 ते बुधवारी सकाळी 9:30 या वेळेत ही भीषण खुनाची घटना घडली आहे. गवत गंजीत घालून पेटविण्यात आल्यामुळे अज्ञात सुमारे 5 फुट 2 इंच उंचीच्या तरुणाच्या संपूर्ण शरीराचा कोळसा झाला असून ओळख पटणे कठीण झाले आहे.
अंगावरील जळालेल्या कपड्यापैकी टीशर्ट आणि टॉवेलचे तुकडे पोलिसांना आढळून आले आहेत. कमरेला घातलेला बेल्टही पूर्णपणे जळाला असून त्याचे बकल आणि उजव्या हातात घातलेली अंगठी घटनास्थळी सापडली आहे. माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.