मेडिकलसाठी सामायिक प्रवेश परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी खुशखबर म्हणजे ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड अंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नीट -यूजी परीक्षेला बसण्यासाठी निश्चित केलेली वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे.
नीट -युजी परीक्षेसाठीची वयोमर्यादेची अट मागे घेण्यात आल्यामुळे मेडिकलसाठी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या सर्व उमेदवारांना आता संधी मिळणार आहे, तर नव्या कमी वयाच्या उमेदवारांना यापुढे तगडी स्पर्धा सोसावी लागणार आहे.
यापूर्वी सदर परीक्षांना बसत असताना बारावी उत्तीर्ण अथवा 17 ते 20 वर्षे वयाच्या उमेदवारांना प्रवेश देण्याची अट होती. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आणि वय पुढे गेल्यास पुन्हा परिक्षेला बसता येत नव्हते.
मात्र आता पुन्हा पुन्हा ही परीक्षा देता येऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.