गौंडवाड येथील शेतकरी धामणेकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये आसरा घेतलेला धामण जातीच्या 8 फुटी सापाला सर्पमित्र ज्योतिबा कंग्राळकर यांनी आज शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
सर्पमित्र ज्योतिबा कंग्राळकर यांनी गेल्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2000 ते 2500 वेगवेगळ्या जातीच्या सापांना यशस्वीरित्या पकडून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्याद्वारे त्यांना जीवदान दिले आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना जोतिबा कंग्राळकर म्हणाले की, उन्हाळ्यात बहुतांश साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेण्यास बाहेर येत असतात. त्यामुळे जास्त करून शेतवाडीमध्ये ते मोठ्या प्रमाणात फिरताना आढळतात. अशावेळी सापांना मारण्याऐवजी त्यांना जीवदान दिले पाहिजे. खरंतर साप हा माणसाला घाबरत असतो तेंव्हा साप आढळताच माणसाने त्याला त्याच्या मार्गाने जाऊ दिले पाहिजे.
अशा प्रसंगी साप तुम्हाला कांही करणार नाही. ज्यावेळी माणूस सापाची डिवचण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी साप विचलित होतो. माणसावर फणा काढण्याचा काम करत असतो, अशी माहिती कंग्राळकर यांनी दिली
मी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून साप पकडण्याचे काम करत असून मला अजूनपर्यंत सापाकडून कोणत्याही प्रकाराचा धक्का पोहोचला नाही. जसा माणूस हा एकमेकांना सहकार्य करतो, तसेच माणसानेही सापाला सहकार्य करणे गरजेचे आहे. साप आपण होऊन कधीच माणसावर हल्ला करून चावण्याचा प्रयत्न करत नाही. ज्यावेळी माणूस त्या सापाला डिवचण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी साप आपला नैसर्गिक असा आक्रमक पवित्रा घेत असतो, असे ज्योतिबा कंग्राळकर यांनी स्पष्ट केले.