बेळगाव शहरातून पहिली ते तिसऱ्या रेल्वे गेट दरम्यान नव्याने घालण्यात आलेल्या रुळावरून दोन दिवसापूर्वी पहिल्यांदा हरिप्रिया एक्सप्रेस धावली. आता हा मार्ग नियमित सुरूच राहणार असल्याची माहिती नेऋत्य रेल्वे विभागातर्फे देण्यात आली आहे.
सध्या मिरज ते लोंढापर्यंत रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. या अंतर्गत येणाऱ्या बेळगाव रेल्वे स्थानकाजवळील कामही गतीने सुरू करण्यात आले आहे. गेल्या काथही दिवसांपासून रेल्वे स्थानक ते तिसऱ्या रेल्वे गेटदरम्यान दुसरा लोहमार्ग घालण्याचे काम गतीने सुरू होते.
आता हा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू खुला करण्यात आला आहे. पहिल्याचे तिसऱ्या रेल्वे गेट दरम्यान असलेल्या जुन्या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या नव्या लोहमार्गावरून रेल्वेची ये-जा सुरू झाली आहे.
बेळगाव ते लोंढा दरम्यान अद्याप रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम अपूर्णच आहे. ते गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव ते हुबळी दरम्यान लोहमार्ग काम पूर्ण झाल्यानंतर विद्युतीकरणाचे काम देखील हाती घेतले जाणार आहे.
दरम्यान, नैऋत्य रेल्वेचे डीजीएम एम. जी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व आसपास रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे कामे गतीने सुरू आहे. रेल्वे स्थानक ते तिसऱ्या रेल्वे गेट दरम्यान केलेल्या नव्या लोहमार्गावर प्रथम हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वे धावली असून आता हा मार्ग सुरूच राहणार आहे.