पुणे आणि बेंगलोर यांच्यात दुवा साधणार्या सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या दोन्ही महानगराला दरम्यान नवा महामार्ग बांधण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च 40,000 कोटी रुपये इतका असून नव्या महामार्गामुळे सध्याचे अंतर 75 कि. मी.ने कमी होणार आहे.
पुणे आणि बेंगलोर या दोन्ही शहरांना जोडणारा नवा 699 कि. मी. अंतराचा राष्ट्रीय महामार्ग सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातून जाणार असल्याचे केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पावसाळ्यात सध्याचा 775 कि. मी. अंतराचा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी पाण्याखाली जात असतो. यासाठी नवा राष्ट्रीय महामार्ग अशा पद्धतीने बांधण्यात येणार आहे की कोणत्याही ठिकाणी तो पूरग्रस्त होणार नाही, असेही मंत्री गडकरी यांनी सांगली येथे एका सभेमध्ये बोलताना सांगितले.
नवा राष्ट्रीय महामार्ग 40 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार असून जो दुष्काळी प्रदेशासह सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठे महांकाळ या विकसनशील प्रदेशातून जाणार आहे. कर्नाटकात हा महामार्ग बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पळ, बेळ्ळारी, दावणगिरी, चित्रदुर्ग व तुमकुरमधून बेंगलोरला जाणार आहे.