बेळगाव डिस्ट्रिक्ट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (बीडीसीसी) मुरगोड शाखेमध्ये गेल्या 6 मार्च रोजी झालेल्या रोख 4.37 कोटी रुपयांसह 1.63 कोटी रुपये किमतीच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात आज जिल्हा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
बँकेचा कर्मचारीच या धाडसी चोरीचा प्रमुख सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. बीडीसीसी बँकेच्या मुरगोड शाखेतील क्लार्क बसवराज हुनशीकट्टी (वय 30), संतोष कंबार (वय 31) आणि गिरीष बेलवल (वय 26) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
आरोपींना अटक करण्याबरोबरच पोलिसांनी त्यांच्याकडून 4 कोटी 20 लाख 98 हजार 400 रुपयांची रोकड आणि 1 कोटी 63 लाख 72 हजार 220 रुपये किंमतीचे 3 किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
त्याचप्रमाणे चोरीसाठी वापरण्यात आलेली कारगाडी आणि एक मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.