अथणी येथील सरकारी हॉस्पिटलबद्दलच्या वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेताना लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे आणि डीवायएसपी जी. रघू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल बुधवारी अथणी सरकारी हॉस्पिटलवर धाड टाकली. यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अथणी सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियेसाठी रक्कम उकळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल लोकायुक्त खात्याने घेतल्यामुळे हे धाडसत्र राबविण्यात आले आहे.
लोकायुक्त एसपी यशोदागुडे व डीवायएसपी जी. रघू यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून बुधवारी हॉस्पिटल धाड टाकण्यात आली. त्यावेळी सुमारे 4 तास हॉस्पिटलमधील कारभाराची चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी लोकायुक्त पथक तेलसंग, ऐगळीला रवाना झाले.
अथणी सरकारी हॉस्पिटलमध्ये विविध शस्त्रक्रियेसाठी 1000 ते 5000 रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी गेल्याने ही कारवाई करण्यात आली.
यावेळी अथणी सरकारी हॉस्पिटलचे प्रमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बसगोंडा कागे आणि स्थानिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. एसपी यशोदा वंटगुडे आणि डीवायएसपी जी. रघू यांनी सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली आहे.