श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना (आर) बेळगाव आणि तलाव विकास समिती बसवन कुडची यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत बसवन कुडची येथील कळसगिरी तलाव पुनरुज्जीवन कार्याचा उद्घाटन समारंभ बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
बसवन कुडची येथील कळसगिरी तलाव ‘नम्मुरू नम्म केरे’ कार्यक्रमांतर्गत श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना (आर) बेळगाव आणि तलाव विकास समिती बसवन कुडची यांच्या संयुक्त विद्यमाने बसवन कुडची येथे गेल्या शुक्रवारी कळसगिरी तलाव पुनरुज्जीवन कामाच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तलाव पुनरुज्जीवन कार्याला चालना देण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, श्री क्षेत्र धर्मस्थळ हे अन्नदान, विद्यादान, औषधदान व अभयदान या चतुर्विदीदानासाठी प्रसिद्ध आहे. जनसामान्य नागरिक आणि समाजाच्या विकासासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ सुमारे 40 वर्षापासून कार्यरत आहे. आता धर्मस्थळ संघाच्यावतीने बसवन कुडचीतील कळसगिरी तलाव पुनरुज्जीवन करण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. बसवन कुडचीमध्ये यापूर्वी अशी विकास कामे झाली नाहीत. परंतु आता सर्वाधिक विकास कामे याठिकाणी सुरू आहेत असे सांगून आमदार निधीतून कळसगिरी तलाव विकासासाठी अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन आमदार बेनके यांनी दिले. त्याचप्रमाणे त्यांनी वैयक्तिक आणि ग्रामस्थांच्यावतीने प. पू. पद्मविभूषण राजर्षी वीरेंद्र हेगडे आणि मातृश्री हेमावती वीरेंद्र हेगडे यांना धन्यवाद अर्पण केले.
याप्रसंगी तलाव विकास समिती बसवन कुडचीचे अध्यक्ष शीतल पाटील, श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना बेळगावचे संचालक प्रदीप जी. शेट्टी, नगरसेवक बसवराज मोदगेकर, बसवेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष महावीर पाटील, धर्मस्थळ संघ बसवन कुडचीचे सर्व सदस्य आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
महिला पौरकार्मिकांचा ‘यांनी’ केला सत्कार
शहरातील लिंगायत संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आज महांतेशनगर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये पौरकार्मिक महिलांचा सत्कार करण्यात आला.
महांतेशनगर येथील हलकट्टी भवनामध्ये आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आमदारांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, आपल्या देशांमध्ये महिलांना देवीचे स्वरूप मानले जाते. समाजामध्ये महिलांना विशेष स्थान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम व अनेक योजना बनविल्या आहेत. पौरकार्मिक म्हणून काम करणाऱ्या सर्व महिलांचा मी आभारी आहे. कारण त्या जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतात. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लिंगायत संघटनेचा देखील मी आभारी आहे, असे आमदार बेनके म्हणाले.
सदर कार्यक्रमात बेळगाव महापालिकेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने पौरकार्मिक म्हणून काम करणाऱ्या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्ष सौ. दानम्मा जलकी, प्रा. गुरुदेवी हुलेप्पनावर, सौ. नेत्रा रामापुरे, सौ. विद्या आडगुनकर व इतर मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार झाला. कार्यक्रमास लिंगायत संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.