कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या निमंत्रितांच्या श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत 4 सुवर्ण व 2 कांस्य पदकांची घसघशीत कमाई करून बेळगावचे पर्यायाने देशाचे नांव उज्ज्वल करणार्या नामवंत महिला जलतरणपटू आणि कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी (होसट्टी) यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला.
कोलंबो, श्रीलंका येथील थ्रस्टन कॉलेज जलतरण तलावामध्ये गेल्या 5 मार्च रोजी निमंत्रितांची श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्योती कोरी यांनी 40 ते 45 वयोगटांमध्ये 200 मीटर फ्रीस्टाइल तसेच 25, 50 व 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक, तसेच 50×200 मीटर फ्रीस्टाइल रिले आणि 50×200 मीटर मिक्स रिले शर्यत कांस्य पदक पटकाविले आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील या चमकदार कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मानाची म्हैसुरी पगडी व शाल घालून ज्योती कोरी (होसट्टी) यांचा सत्कार केला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन करताना ज्योती कोरी यांच्या कामगिरीबद्दल प्रशंसोद्गार काढले आणि त्यांना जलतरणातील भावी कारकिर्दीसाठी सुयश चिंतले.