खानापूर येथील आरटीआय कार्यकर्ता 64 वर्षीय जयंत मुकुंद तिनईकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला दीड लाखाची सुपारी घेऊन करण्यात आला आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी खानापूर येथील हॉटेल व्यावसायिकासह 9 जणांना अटक केली असून सरकारी जागेच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
लक्ष्मण बाबुराव शेट्टी (वय 55, रा. रूमेवाडी क्रॉस खानापूर), लोकेश तिप्पन्ना कलबुर्गी (वय 34, रा. चौराशी गल्ली खानापूर), गंगाप्पा रामाप्पा गुजनाब (वय 34), भरमा कऱ्याप्पा दासनट्टी (वय 35, दोघे रा. मार्कंडेयनगर), सुनील गोविंद दिवटगी (वय 24), मंजुनाथ सोमशेखर होसमनी (वय 24, दोघे रा. गजानननगर उद्यमबाग), सचिन प्रभू यरझर्वी (वय 21, रा. तिसरे रेल्वेगेट) ईश्वर महादेव हुबळी (वय 23, रा. शिवशक्तीनगर अनगोळ) आणि अखिलेश अंबिकाप्रसाद यादव वय 27 रा. ब्रह्मनगर उद्यमबाग) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
खानापूर येथील क्रीडा मंडळ कॅंटीनच्या जागेच्या वादातून जयंत तिनईकर यांच्यावर हल्ल्याची घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मुख्य संशयित हॉटेल व्यावसायिक लक्ष्मण शेट्टी याने खानापुरातील सरकारी जमिनीत असलेला क्लब व जागा आपल्या नांवावर करून घेतली आहे. आरटीआय कार्यकर्ता तिनईकर यांनी माहिती अधिकाराखाली तपशील मागून सदर जमीन सरकारी असल्याचे पुरावे मिळवले होते.
सदर जमिनीचा ताबा सरकारने घ्यावा अशी मागणी त्यांनी तहसीलदार व जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे. तिनईकरांकडून आपल्याला त्रास होत असून त्यांचा बंदोबस्त करावा असे शेट्टीने लोकेश कलबुर्गी याला सांगितले होते. त्यानंतर त्याने गंगाप्पा गुजनाब याला तिनईकरांना मारण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची सुपारी देण्याचे ठरवले. तसेच टोकण म्हणून 50 हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते. गंगाप्पाने आपल्या उपरोक्त सहकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊन तिनईकर यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
जयंती तिनईकर कामानिमित्त गेल्या शुक्रवार दि. 4 मार्च रोजी बेळगावला आले होते. याची माहिती लोकेश कलबुर्गीने हल्लेखोरांना दिली होती. त्यादिवशी लक्ष्मण शेट्टीही बेळगावात होता लक्ष्मणने पाठलाग करून हल्लेखोरांना माहिती पुरवली. त्यामुळे त्यादिवशी सायंकाळी झाड शहापूर जवळ तिनईकर यांची कार अडवून त्यांच्यावर रोडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयंत तिनईकर त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त एम. बी बोरलिंगय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. घटनेनंतर केवळ आठवड्याभरात या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सूनिलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 जणांना अटक केली असून त्यांना काल गुरुवारी दुपारी खानापुरात नेण्यात आले होते. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.