सौंदत्ती (जि. बेळगाव) तालुक्यातील मुरगोड डीसीसी बँक शाखेमध्ये घालण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याचा तपास लावण्यात बेळगाव पोलिसांना यश आल्याचे समजते. तसेच दरोडेखोरांना गजाआड करण्यात आल्याचे कळते.
अलीकडेच मुरगोड डीसीसी बँकेमध्ये बनावट चाव्यांचा वापर करून सुमारे चार कोटींहून अधिक म्हणजे 4 कोटी 41 लाख रुपयांची रोकड आणि सुमारे 1.5 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना गेल्या 6 मार्च रोजी घडली होती.
या प्रकरणाचा तपास लावून पोलिसांनी आरोपींना गजाआड केले असून बँकेचा क्लार्कच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे कळते. याप्रकरणी अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नसली तरी सदर प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज रविवारी सायंकाळी 5 वाजता मुरगोड येथे पत्रकार परिषद बोलवली असून त्यावेळेस या प्रकरणावर अधिक प्रकाश पडून दुजोरा मिळणार आहे.