बेळगाव शहरात फेब्रुवारी अखेरपर्यंत असलेला थंडीचा प्रभाव आता मार्चच्या मध्यावधीला पूर्णपणे संपला असून हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. या पद्धतीने शहरात उन्हाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यात असलेला थंडीचा कडाका गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे नाहीसा झाला आहे. आता हवेतील उष्मा वाढण्यास सुरुवात झाली असून दुपारनंतर अंगातून घामाच्या धारा वाहण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे गरम कपडे कपाट बंद झाले असून नागरिकांनी सुती कपड्यांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव शहराचे किमान तापमान 16.6 सेल्सियस इतके आहे, मात्र काल बुधवारी ते 35.8 सेल्सियस इतके वाढले होते.
उष्म्यात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे कोल्ड्रिंग हाऊस चालक आणि शीतपेय विक्रेत्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या असून नागरिकांच्या सेवेसाठी हे सर्व जण सज्ज झाले आहेत. गेल्या कांही दिवसापासून वाढलेल्या उष्णतेमुळे शीतपेय आणि नारळ पाण्याची मागणी वाढू लागली आहे परिणामी कोल्ड्रिंक हाऊस आणि शीतपेय विक्रीच्या गाड्यांसह शहाळी विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे.
कौलारू घराच्या तुलनेत काँक्रीटच्या घरांसह निवासी संकुलांमधील फ्लॅटमध्ये उष्मा अधिकच जाणवू लागला आहे. त्यामुळे दुपारनंतर अंगाची काहिली होण्यास सुरुवात झाली आहे. मार्चमध्येच ही परिस्थिती निर्माण झाली असून मेपर्यंत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकंदर गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहराला आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे.