हिरेबागेवाडी आणि मारिहाळ पोलीस ठाण्याच्या घरफोड्या करणाऱ्या 4 चोरट्यांच्या चौकडीला हिरेबागेवाडी पोलिसांनी काल सोमवारी गजाआड केले असून त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागेंद्र उर्फ स्वामी तिप्पन्ना कोळेकर (वय 23, रा. शिवाजी गल्ली, तारीहाळ ता. जि. बेळगाव), ज्योतिबा उर्फ अजय अप्पय्या तिप्पाई (वय 27, रा. शिवाजी गल्ली, तारीहाळ), महेश प्रकाश खणगांवकर वय 21, रा. संभाजी गल्ली तारीहाळ) आणि मंजुनाथ अप्पय्या कोळेकर (वय 21, रा. रामापुर गल्ली, तारीहाळ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या पद्धतीने हिरेबागेवाडी पोलीस ठाणे आणि मारिहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये घडलेल्या घरफोड्यांच्या प्रकरणांचा छडा लावताना पोलिसांनी वरील चौघांना गजाआड केले आहे. तसेच चौघांच्या ताब्यात असलेले सुमारे 14 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गृहोपयोगी वस्तू आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या उपायुक्त रविंद्र गडादी, उपायुक्त स्नेहा पी. व्ही. आणि बेळगाव ग्रामीण उपविभाग एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार एन. सिन्नुर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सिन्नुर यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईत हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, पोलीस कर्मचारी वाय बी हत्तरवाडी, ए. के. कांबळे, एस. एस. भावी, जे. ए. पाटील, आर. एस. केळगीनमनी, एम. एस. मंटूर, एस. एम. अळळ्ळी, एस. एस. जगजंपी आणि तांत्रिक विभागाचे रमेश अक्की यांचा सहभाग होता. हिरेबागेवाडी पोलिसांच्या या कारवाईची पोलिस आयुक्तांनी प्रशंसा केली आहे.