देसूर (ता. जि. बेळगाव) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पंढरपूर होऊन बेळगावात दाखल झालेली श्रीराम मूर्ती आज सायंकाळी सवाद्य मिरवणुकीने देसूरला नेण्यात आली.
देसुर येथील मौजे बसवान गल्ली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या सोमवार दि. 28 मार्च 2022 रोजी होणार आहे. या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणारी श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती पंढरपूरहून मागविण्यात आली असून आज सायंकाळी या मूर्तीचे प्रथम बेळगावात आगमन झाले.
यावेळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन व स्वागत केले. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सवाद्य मिरवणुकीने श्रीरामाची मूर्ती देसूरला नेण्यात आली. ढोलताशासह टाळ मृदंगाच्या निनादात श्रीरामाचा गजर करत निघालेली ही मिरवणूक सार्यांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीत भजनी मंडळासह देसूरवासीय बहुसंख्येने सहभागी झाले होते.
मौजे बसवान गल्ली, देसूर येथील नूतन श्रीराम मंदिरात 28 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2:25 वाजेपर्यंत वास्तु मुहूर्त, मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळस पूजन कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार दि. 29 मार्च रोजी सकाळी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. देसूर येथील या नूतन श्रीराम मंदिरात पुढील महिन्यात म्हणजे दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत श्री राम नवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.