बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेश दारावरील पाईपमध्ये भला मोठा साप शिरल्याने उपस्थित पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
मात्र सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी त्या सापाला शिताफीने पकडल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.याबाबतची माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील पाईपमध्ये एक साप शिरला असल्याचे तेथे असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले.
सापाला पाहताच त्या पोलिसांसह उपस्थित सर्वांचीच भीतीने पाचावर धारण बसून तारांबळ उडाली.
याबाबतची माहिती एकाने लागलीच सर्पमित्र आनंद चिट्ठी यांना देण्यात आली. तेव्हा चिट्ठी आणि ताबडतोब आयुक्तालयाच्या ठिकाणी दाखल होऊन साप प्रवेशद्वाराच्या पाईपमध्ये नेमका कोठे दडी मारून बसला आहे याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने त्या सापाला पकडले. साप पकडला जाताच उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सदर सुमारे 8 फूट लांबीचा साप धामण जातीचा असून सुमारे 6 वर्षे वयाचा असल्याचे आनंद चिट्ठी यांनी सांगितले. तसेच धामण सापांचा सध्या मिलनाचा काळ असल्यामुळे त्यांचा संचार वाढला असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्या पकडलेल्या सापाला चिट्ठी यांनी नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.