दहावीच्या परीक्षेप्रसंगी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असल्याचा आदेश शिक्षण खात्याने काढल्यामुळे ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्या शाळांची तातडीने कॅमेरे बसवून घेण्यासाठी धावपळ उडाली आहे.
राज्यातील एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 139 परीक्षा केंद्रांमध्ये एकूण 36000 विद्यार्थी -विद्यार्थिनी ही परीक्षा देणार आहेत.
या परीक्षेवेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये याकरिता सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक असल्याचा आदेश शिक्षण खात्याने काढला आहे. या आदेशामुळे ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्या शाळांना तातडीने कॅमेरे बसवून घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
त्याचप्रमाणे ज्या शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत या कॅमेर्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोशल मीडियाचा वापर वाढल्याने परीक्षाकाळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये याकरता शाळेचे आवार आणि इतर आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना करण्यात आली आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 139 परीक्षा केंद्रांपैकी अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र कांही शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तर कांही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. अशा शाळांना आवार तसेच प्रश्नपत्रिका जेथे खुली करतात अशा खोलीत कॅमेरे बसवून घेण्याची सूचना शिक्षण खात्याने केली आहे.
दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सक्ती करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्या शाळांनी रविवारपर्यंत सीसीटीव्ही बसून घेऊन त्याची चांचणी करून घेणे गरजेचे आहे. शिक्षण खात्यातर्फे परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती समन्वयक अधिकारी एन. आर. पाटील यांनी दिली आहे.