बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाकडून शहराच्या विविध भागांमध्ये (लेआउटस) असलेल्या जवळपास 101 जागांचा ई -लिलाव केला जाणार आहे. प्राधिकरणाने त्यासंदर्भात 5 मार्च रोजी नोटीसही जारी केली असून येत्या 16 व 17 मार्च रोजी लिलाव केला जाणार आहे.
सदर लिलावात बोली लावू इच्छिणाऱ्यांनी 50,000 रुपयांच्या डिपॉझिटसह अर्ज करावयाचा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पद्धतीने संबंधित जागांच्या लिलावातून जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग कणबर्गी येथील लेआउटच्या (स्कीम नं. 61) विकासासाठी केला जाणार आहे.
कणबर्गी लेआउट येथे कांही निवासी संकुलांची उभारणी आणि व्यावसायिक जागांचा विकास साधण्याची बुडाची योजना आहे.
प्राधिकरणाकडून रामतीर्थ नगर येथील नं. 34, 43 आणि 43 (ए) स्कीममधील 70 जागांचा लिलाव केला जाणार आहे. यापैकी बहुतांश जागा या कॉर्नर प्लॉट्स आहेत.
त्याचप्रमाणे अलीकडेच बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या कुमारस्वामी लेआउट येथील जवळपास 29 जागा आणि लक्ष्मी टेकडी येथील स्कीम नं. 51 मधील एक जागा व चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथील आणखी एक जागा अशा एकूण 101 जागांचा ई लिलाव केला जाणार आहे.