बेळगाव शहरातील हनुमाननगर नजीकच्या महाबळेश्वरनगर येथील रहिवासी उमेश बसवानी दंडगी यांचे आज बुधवारी निधन झाले आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयव दान करण्यात आले आहेत. या पद्धतीने उमेश हे मृत्यूनंतरही खऱ्या अर्थाने जिवंत राहिले आहेत.
महाबळेश्वरनगर येथील प्रतिष्ठित नागरिक उमेश दंडगी यांच्या इच्छेनुसार त्यांचे हृदय यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडाचासह डोळे देखील मरणोत्तर दान करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हनुमाननगर प्रभात शाखेचे स्वयंसेवक असणाऱ्या उमेश दंडगी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.
दंडगी यांनी मरणोत्तर दान केलेल्या अवयवांपैकी हृदयाचा उपयोग केएलई डाॅ. प्रभाकरराव कोरे हॉस्पिटल करणार आहे. त्याचप्रमाणे यकृत ग्रीन कॉरिडोरमधून बेंगलोरला रवाना करण्यात आले आहे. दोन्ही मूत्रपिंडांपैकी एक मुत्रपिंड एसडीएम धारवाड आणि दुसरे तत्त्वदर्शी हुबळी या हॉस्पिटल्समध्ये गरजू रुग्णांसाठी वापरले जाणार आहे.
यकृत आणि मूत्रपिंडं आज सकाळी केएलई हॉस्पिटल येथून खास रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आली. याप्रसंगी उमेश दंडगी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
उमेश दंडगी यांच्या या मरणोत्तर अवयव दानामुळे चौघा गरजू रुग्णांचे जीव वाचणार आहेत. या पद्धतीने मृतांच्या अवयव दानासाठी कुटुंबीय पुढे येत आहेत ही एक उत्साहवर्धक बाब असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून व्यक्त केले जात आहे.