Wednesday, January 8, 2025

/

भवानीनगर खून : गजाआड झालेल्यांची संख्या झाली 7

 belgaum

भवानीनगर मधील रियल इस्टेट व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन त्याचा खून करणाऱ्या आरोपींना पळून जाण्यासाठी सहाय्य करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. सर्वेश सपकाळ (वय 20) आणि सागर मठपती (वय 24, दोघे रा. शास्त्रीनगर) अशी त्यांची नावे आहेत. यामुळे आतापर्यंत या खून प्रकरणात 7 जणांना अटक झाली आहे.

रिअल इस्टेट व्यवसायिक राजू मल्लाप्पा दोड्डबोमण्णावर (वय 41, मूळ रा. हलगा -बस्तवाड, सध्या रा. मंडळी रोड, भवानीनगर) यांची सुपारी देऊन हत्या झाल्याची घटना गेल्या सोमवारी 21 मार्च रोजी उघड झाल्यानंतर पोलिसांनी सूत्रधार आणि मारेकर्‍यांना सभोवती फास आवळण्यास सुरुवात केली. बुधवारी दोघांना गजाआड करण्यापूर्वी मयत राजू याची पत्नी किरण हिच्यासह राजूचे व्यवसायिक भागीदार शशिकांत शंकरगौडा (वय 44, रा. अलारवाड) आणि धर्मेंद्र घंटी (वय 51, रा. हालगा -बस्तवाड) त्यांना प्रारंभी अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी मारेकरी संजय चिन्नास्वामी रजपुत (वय 43, रा. कपलेश्वर मंदिर पाठीमागे) आणि विजय शंकर जागृत (वय 35, रा. महाद्वार रोड) यांना गजाआड करण्यात आले होते.

पुढे लगेच बुधवारी सागर हिरेमठ आणि सर्वेश सपकाळ यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सर्व सातही जणांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. मारेकर्‍यांपैकी सर्वेश सपकाळने राजूवर चाकूने हल्ला केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आणखी कांही आरोपी अद्याप फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.Bhavani nagar

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा कार चालवत होता तर सर्वेशने मोटरसायकलवरून आणखी दोघा जणांना घेऊन राजूची कार अडवली होती. गेला सोमवारी सकाळी राजू वाहनातून मंडोळीला मॉर्निंग वॉकसाठी गेला असता त्याच्या कारला मोटर सायकल धडकून त्याची कार अडवण्यात आली होती. त्यावेळी राजू गाडीतून खाली उतरल्यानंतर त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा मिरची पूड फेकण्यात आली.

त्यानंतर चाकूहल्ला झाला. मिरचीपूड फेकल्यानंतर राजू आरडाओरड करू लागला. अखेर चाकुच्या प्राणघातक वारांमुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोर कार गाडीतून फरारी झाले होते. खुद्द दुसरी पत्नी किरण दोड्डबोमण्णावर हिनेच 10 लाखांची सुपारी देऊन आपला पती राजू दोड्डबोमण्णावर याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. प्रारंभी तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे करण्याचा आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या खून प्रकरणातील सत्य उजेडात आणले असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.