बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयात 7 टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. हिडकलच्या तुलनेत राकसकोप जलाशयाची स्थिती मात्र यंदा उत्तम आहे.
हिडकल जलाशयातून शेतीसाठी देखील पाणीपुरवठा होतो. गेल्या दोन महिन्यात या जलाशयातून शेतीसाठी पाणीपुरवठा झाल्यामुळेच पाण्याची पातळी घटली आहे.
यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पाणी साठा कमी होणार नाही, अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. यंदा 8 मार्च रोजी हिडकल जलाशयात 20.95 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी 8 मार्च रोजी जलाशयात तब्बल 27.60 टीएमसी इतके पाणी होते. हिडकल जलाशयातून बेळगाव शहराला दररोज 8 ते 10 एमजीडी पाण्याचा पुरवठा होतो. त्यासाठी तब्बल 56 कि. मी. लांबीची जलवाहिनी घालण्यात आली आहे.
हिडकलच्या तुलनेत राकसकोप जलाशयाची स्थिती मात्र यंदा चांगली आहे. राकसकोपमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2 फुटांपेक्षा जास्त पाणी साठा आहे. गतवर्षी 8 मार्च रोजी जलाशयातील पाण्याची पातळी 2465 फूट इतकी होती. यंदा 8 मार्च रोजी जलाशयातील पाण्याची पातळी 2467.15 फूट इतकी आहे.
जलाशयातील पाण्याचा योग्य वापर झाला तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते पुरेल असे पाणीपुरवठा मंडळाचे म्हणणे आहे. तथापि दोन्ही जलाशयातील पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. शहर पाणी पुरवठ्याची जबाबदारी यंदा एल अँड टी कंपनीकडे आहे.