रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद मिटवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा, अशी विनंती वजा मागणी बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तातडीने पंतप्रधानांकडे करण्याचे आश्वासन दिले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे महागाई वाढवून सर्वसामान्य भारतीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन देशांमध्ये चाललेल्या या युद्धामुळे सर्व वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. याखेरीज तिसऱ्या महायुद्धाचा धोकादेखील वाढला आहे.
तेंव्हा तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी आणि जीवनावश्यक साहित्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित खबरदारीची पावले उचलावीत. यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांची तातडीची बैठक घेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशा आशयाचा तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.