दिल्ली -बेळगाव -दिल्ली ही विमान सेवा येत्या 27 मार्चपासून दररोज सुरू राहणार असल्यामुळे स्पाईस जेट कंपनीने आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार स्पाईस जेटच्या दिल्ली, हैदराबाद व मुंबई फेऱ्या सुरू होणार आहेत.
सध्या बेळगावमधून दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे, इंदूर, जोधपूर, तिरुपती व अहमदाबाद या शहरांना विमानसेवा सुरू आहे. मात्र आता देशाच्या राजधानीला यापुढे दररोज विमानसेवा सुरू असणार आहे. प्रवाशांनीही आतापासूनच बुकिंग सुरू केले आहे.
स्पाईस जेटने वेळापत्रकात केलेल्या बदलानुसार 27 मार्चपासून दिल्ली येथून सकाळी 6:05 वाजता प्रस्थान करणारे विमान सकाळी 8:45 वाजता बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर सकाळी 9:15 वाजता बेळगाव विमानतळावरून निघालेले विमान सकाळी 11:45 वाजता दिल्लीला पोहोचणार आहे.
हैदराबाद येथून सकाळी 9:50 वाजता निघालेले विमान सकाळी 11:05 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. त्यानंतर बेळगावहून सकाळी 11:25 वाजता ते मुंबईला जाण्यास निघेल आणि दुपारी 12:45 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल.
त्यानंतर दुपारी 1:15 वाजता मुंबई येथून निघालेले विमान दुपारी 2:25 वाजता बेळगावला पोहोचून दुपारी 2:45 वाजता हैदराबादच्या दिशेने रवाना होईल आणि सायंकाळी 4:10 वाजता हैदराबाद विमानतळावर पोहोचेल. आता दररोज दिल्लीला बोईंग विमान सेवा सुरू होणार असल्यामुळे प्रवासी संख्येसह विमानांच्या संख्येतही वाढ होणार आहे. तसेच बेळगाव विमानतळावरील विमानांच्या फेर्यांमध्येही वाढ होणार आहे.