खोल विहिरीमध्ये पाच-सहा दिवसांपासून अडकून पडलेल्या धामण जातीच्या सापाला पशु मित्र विनायक केसरकर यांनी जीवदान दिल्याची घटना आज गुरुवारी काकती येथे घडली.
काकती येथील शेतातील विहिरीमध्ये एक साप गेल्या पाच-सहा दिवसांपासून भिंतीच्या खोबणीत अडकून पडला असल्याचे शेत मालकाच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती गावातील पशु मित्र विनायक केसरकर यांना दिली.
केसरकर यांनी लागलीच त्यावेळी त्या ठिकाणी हजर होऊन प्रथम विहिरीत उतरून त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यात यश न आल्यामुळे त्यांनी विहिरीत बुट्टी सोडून मोठ्या कौशल्याने त्या सापाला बाहेर काढले. त्या वेळी सदर साप हा धामण जातीचा असल्याचे दिसून आले. त्यानंतर विनायक केसरकर यांनी त्या सापाला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
उन्हाळ्याच्या दिवसात गारव्यासाठी साप घरात किंवा शेतामध्ये असलेल्या खोपीत घुसू शकतात. तरी ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी सावध राहावे. सापांना इजा करू नये, असे आवाहन विनायक केसरकर यांनी यावेळी केले.