बेळगाव ते अनमोड दरम्यान खानापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक आणि गावांच्या नावांचे सर्व फलक कन्नड, इंग्रजीसह मराठी भाषेत लावले जावेत. त्याप्रमाणे गणेबैल येथील टोल नाक्याच्या ठिकाणी स्थानिकांना टोलमुक्ती करावी, या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
आपल्या आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने माहिती देताना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले की, बेळगाव ते अनमोड हा जो महामार्ग बनत आहे या महामार्गावरील दिशादर्शक फलक व गावांच्या नावाचे फलक हे फक्त इंग्रजी व कन्नड भाषेमध्ये लिहिलेले आहेत. या फलकांवर मराठीचाही अंतर्भाव केला जावा अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्राधिकरणाचे संचालक यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन दिले आहे. याव्यतिरिक्त भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे देखील आम्ही दिशादर्शक व गावांच्या नावांच्या फलकांवर मराठी भाषेचाही अंतर्भाव करावा अशी मागणी केली आहे. आमची मागणी रास्त असल्याचे मान्य करून अल्पसंख्यांक आयोगाने देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी सुधारणा करण्याची सूचनाही केली आहे. तथापि अद्यापपर्यंत त्यासंदर्भात कार्यवाही झालेली नाही, असे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावरील नामफलकांवर मराठीचा अंतर्भाव करण्याव्यतिरिक्त या भागातील स्थानिक जनतेकडून टोल नाक्यावर टोल वसुली केली जाऊ नये अशी आमची मागणी आहे. या भागातील जनता वाहनातून कृषी साहित्य अथवा कृषी उत्पादने तसेच जोडधंदा असलेल्या वाळू विटा घेऊन जात असतात यांच्याकडून तसेच स्थानिक प्रवासी टॅक्सी चालक किंवा बेळगाव औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती अशा स्थानिक सर्वांकडून टोल नाक्यावर टोलवसुली केली जाऊ नये, अशी मागणी आज आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारकडे करीत आहोत, असे धनंजय पाटील यांनी सांगितले. तसेच आपल्या या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
टोल नाक्यावरील आंदोलनाप्रसंगी राष्ट्रीय महामार्गावर मराठी फलक लागलेच पाहिजेत, भाषिक अल्पसंख्यांक आजचे हक्क मिळालेच पाहिजेत आदी घोषणा देण्यात येत होत्या. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, कृष्णा कुंभार, म्हात्रू धबाले, रवी पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, दर्शन डिचोलकर, गणेश पाटील, नागेश कांबळे, बबलू मोटर, ऋतिक कुलम, गंगाधर गुरव, विवेक पाटील आदींचा सहभाग होता.