येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील एका राष्ट्रीयकृत बँक शाखेच्या भोंगळ कारभाराला ग्राहक त्रासून गेले असून ही बँक लवकरच बंद होते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
येळ्ळूर येथील संबंधित बँक या ना त्या कारणावरून कायम चर्चेत असते. सदर बँकेत येणाऱ्या ग्राहकांना कधी सर्व्हर डाऊन, कधी कर्मचारी नाहीत तर मशीन बंद पडले अशी थातूरमातूर उत्तरं देऊन कायम त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. यात भर म्हणून मागील आठवडय़ात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली म्हणून आठ दिवस बँक बंद होती.
त्यानंतर आता कॅश नाही म्हणून ग्राहकांना परत पाठविण्यात येत आहे. एकंदर या ना त्या कारणास्तव सदर बँक शाखेकडून ग्राहकांना सतत त्रास व मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बँक शाखेच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करून ही बँक लवकरच बंद पडणार असल्याचे बोलले जात आहे. तरी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी येळ्ळूरवासियांमधून केली जात आहे.