बेळगाव महापौर निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या कौन्सिल विभागाने 65 मतदारांच्या यादीसह प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास महापौर निवडणुकीची तारीख कधी जाहीर करणार याकडे नगरसेवकांसह साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बेळगाव महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण गेल्या 25 जानेवारी रोजी निश्चित झाले तरी महापालिकेकडून पुढील हालचाली झाल्या नव्हत्या. आरक्षण निश्चित झाले की महापालिकेकडून निवडणूक घेण्याचा प्रस्ताव व मतदारांची यादी प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविले जाते.
गेल्या आठवड्यात महापालिकेने मतदार यादी तयार केली त्यानुसार 58 नगरसेवक, 4 विधानसभा सदस्य व 1 विधान परिषद सदस्य तसेच 2 लोकसभा सदस्य असे एकूण 65 जण अशी मतदार संख्या होते.
बेळगावचे महापौरपद सामान्य महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे यावेळी मोठी चुरस आहे. सामान्य प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या सर्वच नगरसेविका महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यावेळी पहिल्यांदाच महापौर निवडणूक ही भाषेचे ऐवजी जातीच्या मुद्द्यावर लढविली जाणार आहे.
त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे बेळगाव व हुबळी धारवाड या दोन्ही महापालिकांच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांना जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे ते निवडणूक वेळापत्रक कधी जाहीर करणार याकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष आहे.