युद्धाचा भडका उडालेल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक असलेली बेळगाव संतीबस्तवाड येथील फईजा अल्ताफ सुबेदार या विद्यार्थिनीचे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह आज रात्री भारतात सुखरूप आगमन होणार असल्यामुळे तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप स्वदेशी आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. संतीबस्तवाड (ता. जि. बेळगाव) येथील फईजा अल्ताफ सुबेदार ही वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी गेल्या दोन वर्षापासून उच्च शिक्षणासाठी युक्रेनमध्ये आहे. चेनएफसी राज्यात वास्तव्यास असलेली फईजा बोकोव्हेनिया विद्यापीठामध्ये (बीएसएमयु) एमबीबीएसचा अभ्यासक्रम शिकत असून ती दुसऱ्या वर्षात आहे. अचानक उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा ठप्प झाली आहे.
परिणामी विद्यार्थ्यांनासमवेत फईजा देखील युक्रेनमध्ये अडकून पडली होती. मात्र तेथील भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाने तिच्यासह तेथील अन्य भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना रस्तेमार्गे बसने रुमानिया सीमेपर्यंत आणि रुमानिया येथून विमानाने भारतात मुंबई येथे पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
फईजाने भारताच्या एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना युक्रेनमधील भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाने भारतीय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुखरूप स्थलांतरासाठी हाती घेतलेल्या मदत कार्याची माहिती दिली. आपल्याला 45 मिनिटात रुमानिया सीमेवर पोचायचे आहे तयार रहा, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर तात्काळ दाखल झालेल्या बसेसमधून आम्हाला सुखरूप रुमानिया सीमेवर आणून सोडण्यात आले. यादरम्यान आम्हा सर्वांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. सर्व काही इतक्या जलद आणि सुरळीत नियोजनबद्ध पार पाडण्यात आले की आम्हाला कोणताही त्रास झाला नाही, असे फईजा सुबेदार हिने वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला सांगितले.
दरम्यान, युक्रेनमधील युद्धामुळे फईजा हिच्या पालकांना मोठी चिंता लागून राहिली होती. यासंदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना फईजाचे वडील अल्ताफ सुबेदार यांनी आपली मुलगी सुरक्षित सुखरुप परतत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. फईजा ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे ते चेनएफसी राज्य सध्याच्या युद्धभूमीपासून बरेच दूर आहे. त्याठिकाणी अद्याप युद्धाची झळ बसलेली नाही.
तथापि केंव्हा काय घडेल हे सांगता येत नसल्यामुळे आम्हाला चिंता लागली होती. तथापि आता फईजा अन्य विद्यार्थ्यांसमवेत भारतात येण्यास रवाना झाली असल्यामुळे आमची चिंता दूर झाली आहे. रुमानियाहून विमानाने ती आज रात्री मुंबईला येणार आहे. तिला आणण्यासाठी मी स्वतः मुंबईला निघालो आहे. उद्या आम्ही बेळगावला परतू, असे अल्ताफ सुबेदार यांनी सांगितले.