बेळगाव प्राणिसंग्रहालयातील ‘टायगर सफारी’ सुरु करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू असून येत्या मार्च महिन्यात हा प्रकल्प जनतेसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
भुतरामनहट्टी येथील प्राणिसंग्रहालयातील टायगर सफारी प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. कित्तूर राणी चन्नम्मा निसर्ग धाम म्हणून सुपरिचित असणारे हे प्राणी संग्रहालय बेळगाव शहरापासून 14 कि.मी. अंतरावर आहे. या प्राणीसंग्रहालयात यापूर्वीच तीन वाघ आणण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हंपी प्राणिसंग्रहालयातून मागवलेली तीन सफारी वाहने या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
सध्या या प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, बिबटे, अस्वल, सांबर, हरीण, टिपक्याचे हरीण, इमू, कोल्हे, मगरी, चारशिंगी काळवीट आदी प्राण्यांसह मोर, विविध प्रजातींचे पक्षी, मत्स्यालय आहे. सर्व काही सुरळीत झाले तर या ठिकाणची टायगर सफारी येत्या 20 दिवसात सुरू होणार आहे. यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण लवकरच प्रवेश फी निश्चित करणार आहे.
टायगर सफारी प्रकल्पाच्या तयारीचा एक भाग म्हणून सफारीचे मुख्य प्रवेशद्वार बांधून पूर्ण करण्यात आले आहे. एक होल्डिंग रूम देखील बांधण्यात आली आहे. टायगर सफारीच्या 1.5 कि.मी. अंतराच्या रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू असून एक-दोन दिवसात ते पूर्ण होणार आहे.
छोटे तलाव आणि नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून मनरेगा योजनेअंतर्गत कांही सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. बेळगाव प्राणीसंग्रहालयातील टायगर सफारी सुरू झाल्यास शहरवासीयांना जंगलामध्ये प्रत्यक्ष जवळून वाघांचे निरीक्षण करण्याचा रोमहर्षक अनुभव घेता येणार आहे.