बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून कोट्यावधी रुपयांचे भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला आहे. तेंव्हा त्यांचे हितरक्षण करण्यासाठी आपण पर्यायी भाजी मार्केट स्थापन करून त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज शुक्रवारी सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. हा मोदी सरकारने अस्तित्वात आणलेल्या नव्या कायद्यांचा परिणाम आहे. देशांमध्ये खाजगी मार्केटचे सरकारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अतिक्रमण होत आहे. यावर सरकारनेच तोडगा काढला पाहिजे.
जिल्हाधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. यासाठी 12 एकर जमिनीत खाजगी बाजारपेठ निर्माण करून एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना वाचवले पाहिजे असे सांगून तीन ठिकाणी या संदर्भात जागेसाठी शोध सुरू असल्याचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
शाळा आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थी -विद्यार्थिनींनी हिजाब आणि भगवी शाल घालून जाणे योग्य नाही तसे होता कामा नये. संबंधित धर्म व्यवस्थेचा तो भाग असला तरी हा प्रकार एकात्मतेला बाधा पोचवणारा आणि जातीय तणाव निर्माण करणारा ठरू शकतो. तेंव्हा शाळा व्यवस्थापनानेच योग्य क्रम घेऊन सर्व कांही सुरळीत केले पाहिजे.
सरकार याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही, असे ते म्हणाले. गोव्यातील निवडणुकांत संदर्भात बोलताना गोव्यामध्ये काँग्रेस पूरक वातावरण असल्याचे सांगून त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष निश्चितपणे सत्तेवर येईल, असा विश्वास आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.